गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किंमती सुमारे 95 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मुंबई / प्रतिनिधीः गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किंमती सुमारे 95 टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळ, तांदळाचे भावही वाढल्यानेे आता सामान्यांच्या ताटातील वरण-भातही दुर्मिळ होण्याची भीती आहे. सरकार आता चिंतित असून खाद्यतेलाच्या आयातशुल्कात कपात करण्याचा विचार करीत आहे.
भारत ज्या देशातून खाद्य तेल आयात करतो, त्या देशातही तेलउत्पादन कमी झाले आहे. इंडोनेशिया, मालदीव, रशियासारख्या देशातून खाद्यतेल आयात केले जाते. गेल्या वर्षभरातच खाद्यतेल चांगलेच भडकले आहे. खाद्यतेलाच्या किंमती 35 टक्क्यांवरून 95 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. नव्वद ते शंभर रुपये प्रतिकिलो मिळणारे खाद्यतेल आता 180 ते दोनशे रुपये किलोपर्यंत भडकले आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर यासंबंधीच्या मंत्रिगटाची लवकरचट बैठक होणार आहे. त्यात खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अन्नपुरवठा मंत्रालयाने तसा प्रस्ताव दिला आहे. मंत्रिगटाच्या बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खाद्यतेलाची दरवाढ लक्षात घेता सरकार आयात शुल्काचा आढावा घेईल. गेल्या दोन दिवसांत भारतातील तेलबियांच्या भावाने उसळी घेतल्याने देशांतर्गत बाजारातील तेल महागले आहे. या वर्षी सोयाबीनला आतापर्यंतचा उच्चांकी म्हणजे 6400 रुपये भाव मिळाला. या वर्षी सोयाबीनमध्ये आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुरवठा नसल्याने आणि चीनकडून चांगली मागणी आल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. शेंगदाणाही तडकला आहे. सूर्यफुलाची स्थिती फारशी वेगळी नाही. मोहरी, करडईचे उत्पादनही कमी झाले आहे. पोल्ट्री उद्योगाने ड्युटी फ्री सोयामील आयातीची मागणी केली आहे. त्याचबरोबर मक्याचे दरही वाढत आहेत. यावर्षी मक्याच्या किंमतीत 15 टक्के वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले आहे. तांदूळ, मसूर, पीठ, मोहरीचे तेल, खाद्यतेल किंमत किंवा चहा आणि मीठाचे भाव एका वर्षात इतके वाढले आहेत, की स्वयंपाकघरचे बजेट पुरते कोलमडून पडले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य तेलाच्या किंमती 47 टक्क्यांनी, डाळींच्या किंमती 17 टक्क्यांनी आणि खुल्या चहाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, भात दर 14.65 टक्के, गव्हाचे पीठ 3.26 टक्क्यांनी वाढले आहेत. पॅक पाम तेलाची किंमत 87 रुपयांवरून 121 रुपयांवर, सूर्यफूल तेल 106 ते 157, भाजीपाला तेल 88 ते 121 आणि मोहरीचे तेल (पॅक) प्रतिलिटर 117 ते 151 रुपयांवर पोहोचले आहे. तिथेच शेंगदाणे 139 ते 165 आणि सोया तेल 99 ते 133 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. खाद्य तेलाव्यतिरिक्त चहा आणि दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एका वर्षात ओपन चहा 217 ते 281 किलोपर्यंत पोहोचला आहे. चहाच्या दरात एकूण 29 टक्के वाढ झाली आहे.
डाळी, मीठही महागले
या एका वर्षात मीठाच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी दूध सात टक्क्यांनी महाग झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार तूर डाळ 91 रुपये ते 106 रुपये, उडीद डाळ 99 ते 109 रुपये, मसूर डाळ 68 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. मूग डाळही 103 ते 105 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.
COMMENTS