Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात

जयसिंगपूर / प्रतिनिधी : घरगुती वीज बिल माफीचे गाजर, पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत आणि आता एफआरपीचे तुकडे या मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना म

’लतादीदींमुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळाले; माझे नाव होऊन माझे अख्खे कुटुंब जगले’
जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप
सहकार पॅनेल अखेर अडकले सापळ्यात…?

जयसिंगपूर / प्रतिनिधी : घरगुती वीज बिल माफीचे गाजर, पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत आणि आता एफआरपीचे तुकडे या मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीला राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात आहे. महिनाभरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सन 2024 च्या लोकसभेचेही संदर्भ याला जोडले जात आहेत.
सन 2017 ला शेतमालाला दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीच्या मागणीवरून पदरी निराशा आल्याने स्वाभिमानी एनडीएतून बाहेर पडली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भाजपकडून दिले जाणारे पाठबळ आणि राजकारण ओळखून स्वाभिमानीने एनडीएला रामराम ठोकला.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीची रचना करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून राज्यपालनियुक्त आमदारकीची जागा देण्यावर एकमत झाले. शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली. मंत्री जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन ही ऑफर देताना बारामतीचेही निमंत्रण दिले. निमंत्रण स्वीकारून शेट्टी यांनी बारामती गाठत शरद पवार यांचा पाहुणचार स्वीकारला.
आमदारकीवरून स्वाभिमानीमध्ये काही काळ कलह निर्माण झाला. ऊर्जामंत्री राऊत यांनी लॉकडाउनमधील वीज बिल माफीचे आश्‍वासन दिले होते. नंतर वसुलीसाठीचा धडाका लावला. पाठोपाठ महापुरात शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांना मुंबईला बोलावून सन 2019 च्या धर्तीवर मदतीची ग्वाही दिली होती. मात्र, तुटपुंजी मदत जाहीर केली. यातच तीन टप्प्यांतील एफआरपीला शासनाने शिफारस दिल्याने आघाडीबद्दल नाराजी आहे. ही सगळी कारणे स्वाभिमानीला आघाडीतून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरणारी आहेत. महाविकास आघाडीचे नेते शेट्टी यांची कशाप्रकारे समजूत काढतात यावरच स्वाभिमानीचे महाविकास आघाडीतील अस्तित्व निश्‍चित होणार आहे.

COMMENTS