Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू स्मारकाच्या उभारणीसाठी 400 कोटींचा आराखडा

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी तब्बल 40

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील
काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
सातारा जिल्ह्यातील युक्रेनमधून सर्व विद्यार्थी सुखरुप परतले; जिल्हा प्रशासनाची माहिती

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी तब्बल 400 कोटींचा आराखडा तयार केला आहे. विकास कामांसाठी तीन टप्पे तयार करण्यात आले आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरद़ृष्टीचा हा अनमोल ठेवा जतन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शाहू मिलच्या सुमारे 26.81 एकर जागेवर राजर्षी शाहूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची घोषणा राज्य शासनाने 18 डिसेंबर 2012 ला नागपूर अधिवेशनात केली होती. 11 ऑक्टोबर 2013 मध्ये राज्य शासनाने स्मारकासाठी 5 कोटींचा निधीही जाहीर केला होता. तसेच 8 जानेवारी 2014 ला राज्य शासनाने स्मारकासाठी 1 कोटी निधी जाहीर केला. त्यानुसार महापालिकेने स्मारकासाठी आराखडा तयार करून घेतला.
सन 2014-15 मधील प्रस्तावानुसार 170 कोटींचा आराखडा होता. महापालिकेने त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला. परंतू जागेचा ताबा कुणाकडे, हा प्रश्‍न निर्माण झाला. वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात जागा असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय किंवा जागा हस्तांतर केल्याशिवाय काहीच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र आराखड्याविषयी शासन स्तरावर कोणतीही हालचाल झाली नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून शाहू मिलची स्थापना झाली. 27 सप्टेंबर 1906 रोजी शाहू मिलची करण्यात आली. देशातील सरकारी मालकिचा हा पहिला उद्योग होता. शाहू मिलने कोल्हापूरच्या उद्योग विश्‍वात भर घातली. कालांतराने 4 फेब्रुवारी 2001 मध्ये मिल बंद पडली. त्यानंतर सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने जागा विकसित करून गारमेंट पार्क तयार करण्याचे धोरण जाहीर केले. 17 एप्रिल 2007 रोजी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाने त्याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. 2 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यासंदर्भातील टेंडर नोटीस प्रसिध्द करण्यात आली. त्याअंतर्गत आलेली एक निविदा मंजूर करण्यात आली. टेंडरनुसार 10 टक्के जागा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरणे, 40 टक्के जागा टेक्स्टाईल कॉम्पोनन्ट कॉम्प्लेक्ससाठी वापरून ती जागा महामंडळाला द्यायची ठरले होते. परंतु वाटाघाटी फिसकटल्या आणि नोटीसही रद्द झाली. पुढे न्यायालयीन वादही झाले.
श्री शाहू छत्रपती मिलची जागा सुमारे 26.81 एकर इतकी आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे जागेचा ताबा आहे. जागा हस्तांतरित करण्यासाठी महामंडळाने 107 कोटींचा मूल्यांकन अहवाल सादर केला आहे. ही जागा महापालिकेकडे विनामूल्य हस्तांतरित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागा वर्ग झाल्यानंतर खर्या अर्थाने स्मारकाच्या कामाला गती येईल. शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त 6 मे 2022 रोजी शाहू कृतज्ञता पर्व साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने शाहू मिलचे अंतरंग जनतेसमोर आले. आता त्याचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे.

COMMENTS