संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मानसिकता नेतृत्वाठायी असावी लागते,सोबत कार्यकर्त्यांचेही समर्पण तितकेच महत्वाचे ठरत
संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मानसिकता नेतृत्वाठायी असावी लागते,सोबत कार्यकर्त्यांचेही समर्पण तितकेच महत्वाचे ठरते.अर्थात या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत.कार्यकर्त्यांशी नेतृत्वाने संवाद साधून पक्षाची ध्येय धोरणे सतत कार्यकर्त्यांच्या मनात जागती ठेवणे अपेक्षीत असते,तर कार्यकर्त्यांचे समर्पण दिसले तर हा संवाद आणखी फुलतो.ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या काँग्रेस पक्षात ही बाब प्रकर्षाने दुर्ल क्षीत होत असल्याची जाणीव जुन्या जाणत्या जेष्ठांना होऊ लागली आहे.या अर्थाने पी.चिदंबर यांनी केलेल्या ट्विटकडे सकारात्मक नजरेने पहावे लागेल.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चौफेर सहभागी असलेली संघटना म्हणून काँग्रेसचे योगदान वादातीत आहे,कुणी कितीही नाकारले तरी तत्कालीन काँग्रेसच्या दुरदृष्टीमुळे भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग प्रत्येक आंदोलनानंतर प्रशस्त होत गेला हे जागतिक सत्य आहे.स्वातंत्र्य चळवळीत संघटना म्हणून सहभागी होतांना काँग्रेसच्या तत्कालीन नेते मंडळींनी कार्यकर्ता हा मुख्य केंद्रबिंदू मानून रचनात्मक संघटन करण्यावर भर देत होते.त्याचा सकारात्मक परिणाम कार्यकर्त्यांच्या समर्पणातून स्पष्टपणे दिसतही होता.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करण्याचा काही मंडळीचा प्रस्ताव नाकारून स्वतंत्र भारताच्या राजकारणात राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस सक्रीय झाली.त्यानंतर काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वय आणि त्यातून असलेले संवाद सातत्य दोन्ही बाजूचा समर्पण भाव जीवंत ठेवण्यास कारणीभूत ठरला.अगदी वीस पंचवीस वर्षापुर्वीपर्यंत हा संवाद काँग्रेस पक्षाची उर्जा सतत प्रवाहीत करण्यास कारणीभूत ठरला,त्यानंतरच्या काळात मात्र नेते आणि कार्यकर्ता या दोन खांबांमधील वाढत गेल्याने या पक्षाची राजकीय फरफट झाल्याचे दिसते.
काँग्रेस हा पक्ष नसून ती एक विचारधारा आहे.सर्वधर्म समभाव,ग्रामीण जीवनातील बदल व सामान्य माणसाची प्रगती या विचारधारेतूनच होवू शकते,याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या तळागाळात गेल्या पन्नास वर्षांपासून अनेक दिग्गज करीत आहेत.पक्षवाढीसाठी या मंडळींचे योगदान आणि सल्ला मोलाचा ठरतो. अलीकडच्या काळात मात्र अशा मंडळींना जाणीवपुर्वक प्रवाहाबाहेर ठेवण्याचे धाडस होताना दिसते.व्यापक विचारांच्या या पक्षात संकुचित विचारांचे लोक निर्णय प्रक्रियेत सामील झाल्यामुळे हा बदल दिसत असावा.काँग्रेसला राज्यात व केंद्रात उतरती कळा लागलीय. पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आलंय.त्यामुळं कोणी कोणाचे नेतृत्व मानायला तयार नाही.कार्यकर्ता हे पद गोठवून सर्वजण स्वयंघोषीत नेते बनलेत.या बजबजपुरीमुळे व ज्याच्याकडे पाहून राज्यात काँग्रेस एकसंघ होईल – राहील,असा एकही आशावादी चेहरा काँग्रेसकडे राहिला नाही.त्यामुळे राज्यात काँग्रेस दुबळी होत चाललीय.राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी आहे,पण पक्ष वाढीचे काय?मंत्रीपदाची फळे चाखणारानी ‘ग्रास रूट’ला जावून पहावे,म्हणजे पक्ष कुठे आहे याची जाणीव तेंव्हाच होईल.सत्तेत वाटा घेणाऱ्या काँग्रेसला पक्षवाढीसाठी ‘हातात ‘ वाडगा मिळालाय,हे वास्तव स्वीकारून मार्ग काढण्यातच खरे शहाणपण आहे.पक्ष पडझडीच्या काळात काही नव्या व नवख्या चेहऱ्यानां संधी द्यायला हवी.त्या सोबत जुने जाणते , अभ्यास आणि अनुभव या दोन्ही पातळीवर प्रगल्भ असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींनाही पक्षाच्या मुख्य प्रवाहात सन्मानपूर्वक पद देवून दोन्हींची सांगड घातली तर पक्ष पुन्हा जोमाने वाढू शकतो.
काँग्रेस मधील जुन्या जाणत्या नेत्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आणि वेळ निर्माण झालीय.पक्ष वाढीसाठी कोण कधी उपयुक्त आहे, हे ओळखणारे काँग्रेसकडे कोणीच राहिले नाही,त्यामुळे ही वेळ आली आहे,असेच म्हणावे लागेल.
अव्याहतपणे काँग्रेस विचारधारेशी वाहून घेतलेल्या अनेक जुन्या नेत्यांचा पक्षवाढी करिता उपयोग होऊ शकतो.जुन्या जाणत्याबरोबर तरुणांनाही या मंडळींचे विचार भावतात,कारण ते वास्तव असतात.प्रशांत भुषण यांच्यासारखा अभ्यासू राजकीय निरिक्षक आणि राजकारणाचे सुव्यवस्थापन करण्यात हातखंडा असलेले तज्ञही जेंव्हा काँग्रेसमधील मतभेदाची दुखणी दुर करणे एव्हढे सहजसोपे नाही.अशी प्रतिक्रीया देतात.यातच काँग्रेस पक्षाची वाताहात का झाली असेल याचा नेमका अंदाज येतो.त्या पाठोपाठ पी.चिदंबरम यांनी देखील आपल्या ट्विटमधून अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
COMMENTS