कर्जत : कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. त

कर्जत : कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपंचायतीकडून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले.कर्जत शहरात नगरपंचायतीने मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांवर तालुक्याचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या रथोत्सवाचा सोहळा येऊन ठेपला असताना या कारवाईमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार रोहित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष बिभीषण खोसे, मेन रोड व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे, सचिव प्रसाद शहा, उपाध्यक्ष महावीर बोरा, खजिनदार संतोष भंडारी, श्रीकांत तोरडमल, गणेश तोरडमल, अशोक लाळगे, सुरज पाटील,राहुल खाटेर, अंकुश गुंड, किरण काशिद,डॉक्टर वैभव वांगडे, किशोर बोथरा,अरविंद पाटील , आतार, साळुंखे, हरिश्चंद्र गायकवाड, क्षीरसागर, यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.यावेळी व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील वाढती वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांचे पुनर्वसन, पर्यायी बायपास अथवा रिंगरोडची उभारणी, वाहतूक परिणाम अभ्यास , व्यापाऱ्यांवरील अतिक्रमण कारवाईपूर्वी पर्यायी व्यवस्था, तसेच नागरिक, व्यापारी, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक तज्ज्ञ यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय करण्याची मागणी केली. शहरातील १८ प्रमुख चौक, शासकीय कार्यालये, न्यायालय, शाळा, बाजारपेठ आणि उपनगरांकडे जाणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र अभ्यास करून वाहतूक नियोजन करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.व्यापाऱ्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कोणत्याही गोरगरीब व्यापाऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. नगरपंचायतीच्या माध्यमातून १०० गाळे तसेच कुलधरण रस्त्यावर २५ गाळे उभारण्यात आले आहेत. संबंधित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून हा प्रश्न सोडविणे अधिक योग्य ठरले असते, असेही त्यांनी सांगितले.या प्रश्नासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाहीही आमदार रोहित पवार यांनी दिली.व्यापाऱ्यांच्या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला .सभापती शिंदेंवर अप्रत्यक्ष बोचरी टीकाआमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. “आम्ही विकासासाठी निधी आणत आहोत, मात्र काही लोक तो निधी अडविण्याचे काम करत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यापाऱ्यांची दुकाने काढली जाणार नाहीत, असे आश्वासन देणारेच आज कारवाईसाठी आग्रह धरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

COMMENTS