कोपरगाव : उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि दर्जेदार मैदानामुळे राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघाच्या निवड चाचण्यांसाठी संजीवनी युनिव्हर्सिटीची निवड करण्यात आली आ

कोपरगाव : उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि दर्जेदार मैदानामुळे राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघाच्या निवड चाचण्यांसाठी संजीवनी युनिव्हर्सिटीची निवड करण्यात आली आहे. या निवड चाचण्या संजीवनीमध्ये घेण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. यंदा ही संधी मिळाली असून, विद्यापीठाने केलेले क्रीडा नियोजन आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधा कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रवीण अनावकर यांनी केले.अंडर-१५ गर्ल्स सॉफ्टबॉल एशिया कप २०२६ तसेच एशियन युनिव्हर्सिटीज वुमेन्स सॉफ्टबॉल कप २०२६ या स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या निवड चाचण्यांचे उद्घाटन संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये झाले. त्या वेळी डॉ. अनावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते. महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव प्रदीप तळवेलकर, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव ओमप्रकाश शर्मा उपस्थित होते. क्रीडा अधिष्ठाता विरुपक्ष रेड्डी यांनी प्रास्ताविक केले.डॉ. अनावकर यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये अंडर-१५ गर्ल्स सॉफ्टबॉल एशिया कप, तर तैवानमध्ये एशियन युनिव्हर्सिटीज वुमेन्स सॉफ्टबॉल कप होणार आहे. संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या निवड चाचण्यांमधून या दोन्ही स्पर्धांसाठी भारताचे अंतिम संघ निश्चित केले जाणार आहेत.या वेळी सॉफ्टबॉल क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा अमित कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘याच मैदानावरून एखादी खेळाडू उद्या आशियाई स्पर्धेत किंवा ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, असा विश्वास आहे,’ असे अमित कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS