नांदेड: नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या बैठकीत

नांदेड: नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या बैठकीत ऐरणीवर आले. झोन क्रमांक १ आणि २ मधील विविध प्रभागांतील नगरसेवकांनी नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा आधार घेत प्रशासनाला थेट जाब विचारला. अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा कमी दाब, जलवाहिन्यांमधील गळती, तुंबलेल्या गटारी, वेळेवर न होणारी साफसफाई आणि रस्त्यावर साचणारे सांडपाणी या समस्यांमुळे नागरिकांचे जगणेच अवघड झाल्याचे चित्र बैठकीत समोर आले.
महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी केवळ तक्रारींचा पाढा वाचला नाही, तर अनेक प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला. काही वस्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून, गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले. तर काही भागांत दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
स्वच्छतेच्या बाबतीतही चित्र समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी घंटागाड्या नियमित येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवर साचत असून, दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. काही प्रभागांत ड्रेनेज लाईनची कामे अपूर्ण राहिल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश देत जलवाहिन्यांतील गळती तातडीने दुरुस्त करावी, ड्रेनेज चेंबरची सफाई नियमित करावी, उघड्या नाल्यांतील गाळ त्वरित काढावा आणि प्रत्येक प्रभागात वेळेवर कचरा संकलन होईल याची जबाबदारी निश्चित करावी, असे आदेश दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत नगरसेवकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयाच्या अभावाचाही मुद्दा उपस्थित केला. अनेक विकासकामे सुरू असली तरी त्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता नसल्याने त्याचा फटका थेट नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नवीन पाईपलाईन, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी आणि मुख्य ड्रेनेज वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणीही बैठकीत जोरदारपणे करण्यात आली. महापौरांनी विभागप्रमुखांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटी वाढविण्याचे आदेश देत केवळ कागदोपत्री अहवालांवर समाधान न मानता प्रत्येक तक्रारीची पडताळणी करण्यास सांगितले. पुढील आठवड्यात झालेल्या कामांचा आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मात्र, अशा बैठका यापूर्वीही अनेकदा झाल्या असून, त्यानंतरही नागरिकांच्या समस्या कायम राहिल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळी दिलेले आदेश प्रत्यक्ष कृतीत उतरतात की पुन्हा एकदा बैठकीपुरतेच मर्यादित राहतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कारण नांदेडकरांसाठी हा केवळ प्रशासनाचा विषय नसून, दररोजच्या जगण्याशी निगडित असलेला मूलभूत प्रश्न आहे.

COMMENTS