देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिरातील दर्शन व पूजा प्रकरणावरून गावात तणावाचे वातावरण नि

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिरातील दर्शन व पूजा प्रकरणावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मदाय कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या मंदिर समितीच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, स्वयंघोषित पंचकमिटीच्या कथित हस्तक्षेपाला आळा घालावा तसेच मंदिरात लावण्यात आलेली वादग्रस्त पाटी तातडीने हटवावी, अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण वांबोरी गाव बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विठ्ठल भक्त परिवार व समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत सोमवारी (दि. २८) सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकारी श्रीकांत साळे यांनाही निवेदन सादर करत मंदिराच्या जागेच्या नोंदणीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वांबोरी गावात सर्व समाजासाठी एकमेव विठ्ठल मंदिर असून तेथे काही विशिष्ट व्यक्ती व स्वयंघोषित ट्रस्टकडून भाविकांना सेवा व धार्मिक कार्यात सहभागी होण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य वारकरी व भक्तांच्या धार्मिक भावनांचा तीव्र अवमान होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला अर्पण करण्यात आलेले वस्त्र काही वेळानंतर काढून पुन्हा पूजा करून नवीन वस्त्र परिधान करण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होत असून गावातील सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मंदिरात सर्व समाजातील भाविकांना समान अधिकाराने दर्शन व पूजा करण्याची संधी मिळावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरापासून वांबोरी पोलीस चौकीपर्यंत शेकडो ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात किशोर महाराज गडाख, ज्ञानेश्वर महाराज तांबे, नवनाथ महाराज पटारे, किसन पागिरे, मच्छिंद्र ढोकणे, बाजीराव मोरे, मच्छिंद्र तांबे, बाळासाहेब मकासरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS