श्रीरामपूर: ईपीएस-९५ योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी धरणे आंदोलनाच्या

श्रीरामपूर: ईपीएस-९५ योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा मेळावा रविवारी (२ ऑगस्ट) बाभळेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असून, आंदोलनाची रूपरेषा यावेळी निश्चित करण्यात येणार आहे.
बाभळेश्वर येथील बसस्थानकासमोरील सबस्टेशन परिसरात सकाळी ११ वाजता मेळाव्यास सुरुवात होईल. यावेळी पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, उपाध्यक्ष अप्पा वाळके, उत्तर महाराष्ट्र संघटक बापूराव बहिरट, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा आशाताई शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
ईपीएस-९५ योजनेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा ७,५०० रुपये किमान पेन्शन व महागाई भत्ता, मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा तसेच उच्च पेन्शनचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित मेळाव्यास एसटी महामंडळ, शेती महामंडळ, सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने तसेच सार्वजनिक क्षेत्रातील ईपीएस-९५ योजनेतील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अण्णासाहेब म्हस्के पाटील, जी. के. चिंतामणी, विनायक जगताप, रायभान तुपे, एफ. यू. मोरे, संजय ईनामके, नानासाहेब खर्डे यांनी केले आहे.

COMMENTS