बंगळुरू: कर्नाटक राज्यातील महाविद्यालयांमध्ये तब्बल ७००० विद्यार्थी एचआयव्ही (HIV) बाधित असल्याचे समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या संस

बंगळुरू: कर्नाटक राज्यातील महाविद्यालयांमध्ये तब्बल ७००० विद्यार्थी एचआयव्ही (HIV) बाधित असल्याचे समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या संसर्गाच्या प्रमाणामुळे राज्य सरकारने ‘राज्य एड्स प्रतिबंधक संस्थे’च्या शिफारशीनुसार राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमित एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने महाविद्यालयीन स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संसर्गाची कारणे, प्रतिबंधाचे उपाय, सुरक्षित वर्तन आणि उपचारांची सविस्तर माहिती दिली जाईल.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (NACO) अहवालानुसार, एचआयव्ही बाधितांच्या संख्येबाबत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सध्या सुमारे २ लाख ६० हजार नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. त्यापैकी २ लाख ५ हजारांहून अधिक रुग्ण नियमित उपचार घेत आहेत. मात्र, सुमारे ५४ हजार नागरिकांना स्वतःला संसर्ग झाल्याची माहितीच नसल्याचे समोर आले असून, ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, १८ ते ३५ वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सन २०२३-२४ मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या सुमारे ४४ हजार ५०० होती. ती सन २०२५-२६ मध्ये वाढून सुमारे ६६ हजार ६०० वर पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवघ्या दोन वर्षांत झालेली ही वाढ आरोग्य विभागासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. याशिवाय, १८ ते २५ वयोगटातील ७ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

COMMENTS