नांदेड: नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या मालकीच्या 'महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स' या इमारतीच्या छतावर नव्याने सुरू झालेल्या बिअर बारवरून शहरात

नांदेड: नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या मालकीच्या ‘महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स’ या इमारतीच्या छतावर नव्याने सुरू झालेल्या बिअर बारवरून शहरात मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक इमारतीमध्ये मद्यविक्री आणि बिअर बार सुरू झाल्याने विविध सामाजिक संघटना व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर सत्यशोधक विचार, शिक्षण आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अशा थोर महापुरुषाचे नाव असलेल्या सार्वजनिक आणि शासकीय इमारतीत ‘कॉपर अँड कोल बार’ (Copper and Coal Bar) सारखा बिअर बार सुरू करणे, हा त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अनादर असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा सन्मान राखणे ही महापालिका प्रशासन आणि महापौरांची नैतिक जबाबदारी आहे, असे मत जनतेतून व्यक्त होत आहे. महापुरुषाच्या नावाने असणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बिअर बार सुरू राहिल्यास त्या नावाचे पावित्र्य जपले जाणार का, हा प्रश्न मतदार आता भविष्यात भारतीय जनता पक्षाला विचारतील, अशीही चर्चा सुरू आहे.
महापालिकेत कोणाच्या काळात या बिअर बारला बांधकाम परवानगी मिळाली आणि परमिट मिळाले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या निर्मितीच्या वेळी या ठिकाणी बिअर बार चालवला जाईल, अशी कोणतीही अधिकृत माहिती अथवा घोषणा करण्यात आली नव्हती. असे असताना इमारतीच्या सर्वात वरच्या छतावर स्वतंत्र बांधकाम करून बार सुरू करण्यात आल्याने या बांधकामाच्या वैधतेवर आणि दिलेल्या परवानग्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हे बांधकाम महापालिकेच्या नियमानुसार अधिकृत आहे का, हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
महापुरुषांच्या नावाचे औचित्य जपले जावे
या संपूर्ण प्रकरणात महापालिका प्रशासनाने बिअर बारला दिलेली मंजुरी, नियमावलीचे पालन आणि बांधकामाची कायदेशीरता यावर तात्काळ आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वापर करताना महापुरुषांच्या नावाचे औचित्य जपले जावे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, या वादावर महापालिका प्रशासन किंवा बिअर बार चालकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

COMMENTS