Homeताज्या बातम्या

पंढरपुरात महास्वच्छता अभियान; ६०० स्वयंसेवकांनी दोन टन कचरा संकलित

अहिल्यानगर : आषाढी वारीनंतर पंढरपूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून युवा चेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुमारे ६०

शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
बळीराजावर अस्मानी संकट…!
डॉ. सलिम शेख यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. 

अहिल्यानगर : आषाढी वारीनंतर पंढरपूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून युवा चेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुमारे ६०० स्वयंसेवकांनी सोमवारी (दि. २७) पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबविले. या अभियानात अंदाजे दोन टन कचरा संकलित करण्यात आला.

‘सर्वांचा एकच सूर, स्वच्छ करू पंढरपूर’ या घोषवाक्याखाली आयोजित या उपक्रमात अहिल्यानगर, पुणे, पारनेर, निघोज, सोनई, माहिजळगाव आदी भागांतील स्वयंसेवक सहभागी झाले. वारी तळ, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, गोपाळपूर, भक्ती मार्ग, वाळवंट परिसर, श्रीकृष्ण मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, रामबाग तसेच चंद्रभागा नदी परिसरात व्यापक स्वच्छता करण्यात आली.

अभियानादरम्यान प्लास्टिक पिशव्या, द्रोण, प्लास्टिक ग्लास, केळीच्या साली, तुटलेल्या चपला, कुजलेले अन्न यासह विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. मंदिराकडे जाणारे मार्ग आणि चंद्रभागा नदी घाट परिसरही स्वच्छ करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या अभियानाचे कौतुक करत स्वयंसेवकांच्या योगदानाची दखल घेतली.

अमर कळमकर यांनी सांगितले की, पंढरपूर स्वच्छता अभियानाला यंदा १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला ३० ते ४० स्वयंसेवकांपासून सुरू झालेल्या या अभियानात आता राज्यभरातील शेकडो स्वयंसेवक सहभागी होत आहेत. पुढील वर्षी एक हजारांहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागातून हे अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून, स्वच्छतेतून समाजसेवा आणि समाजसेवेतून परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS