Oplus_16908288 बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर शिवाजी वाघमारे यांना त्यांच्य

बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर शिवाजी वाघमारे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत यंदाचा ‘महाराष्ट्र लोकनायक आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दैनिक लोक युवा यांच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेवगाव येथे पार पडणार आहे.
प्रा. वाघमारे हे गेल्या १७ वर्षांपासून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने त्यांनी आपल्या पाटोदा (बेल) या जन्मगावी ‘नालंदा सार्वजनिक वाचनालय’ सुरू केले. तसेच चऱ्हाटा, पाटोदा, बेलखंडी आणि पिंपळवाडी परिसरात संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
वक्तृत्व, निबंध, सामान्य ज्ञान यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. तुलसी शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांच्या प्रेरणेतून प्रा. किशोर वाघमारे यांनी शिक्षण आणि समाजसेवेचा आदर्श प्रवास घडविला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, ही बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. किशोर वाघमारे यांचे शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS