केज: तालुक्यातील कानडीमाळी येथे जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टसह मारहाण व जीवे मा

केज: तालुक्यातील कानडीमाळी येथे जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टसह मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या दरम्यान नानाभाऊ गंगाराम खाडे हे कानडीमाळी येथील चौकात गिरी यांच्या टपरीसमोर रस्त्यावर उभे होते. यावेळी किरण मच्छिंद्र राऊत हा तेथे आला आणि त्याने नानाभाऊ खाडे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. नानाभाऊ खाडे यांनी याबाबत जाब विचारला असता किरण राऊत याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “तू लय माजलास का? तू माझ्या वडिलांना मच्छिंद्र का म्हणतोस?” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.
यानंतर नानाभाऊ खाडे हे त्यांचा मुलगा विकास खाडे यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना किरण राऊत याने पुन्हा त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या घरी जाऊन “तुला कुऱ्हाडीनेच तोडतो,” अशी धमकी दिली. यावेळी नानाभाऊ खाडे यांच्या पत्नी, भावजय व मुलालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नानाभाऊ गंगाराम खाडे यांच्या फिर्यादीवरून किरण मच्छिंद्र राऊत याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.

COMMENTS