किनवट: नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत ९ ऑगस्ट रोजी धडकणार्या ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी किनवट तालुक्यातील आंबेडकरी जनसमुदाय
किनवट: नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत ९ ऑगस्ट रोजी धडकणार्या ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी किनवट तालुक्यातील आंबेडकरी जनसमुदाय आणि बहुजन विचारांचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. या संघर्षमय जनआंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी २५ जुलै रोजी सायंकाळी ४:०० वाजता गोकुंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक पटावर अनुसूचित जातीच्या ५९ घटकांचे सौहार्दपूर्ण अस्तित्व असताना, अवघ्या एका घटकातील काही स्वयंघोषित धुरीणांच्या आग्रहाखातर संपूर्ण समाजावर उपवर्गीकरणाची कुर्हाड चालवण्याचा घाट घातला जात असल्याची तीव्र भावना जनमानसात उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील कडक अटी, वस्तुनिष्ठ अभ्यास आणि आयोगाच्या निकषांना बगल देत, राज्यकर्ते सामाजिक तणाव निर्माण करणारे राजकीय डावपेच आखत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने समाजात दुही माजवणार्या सत्ताधार्यांचा हा डाव उधळून लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड येथे होणार्या या ऐतिहासिक महामोर्चात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप आणि संविधान तज्ज्ञ डॉ. सुरेश माने यांसारखे विचारवंत व सामाजिक धुरीण अन्यायाविरुद्धचा आवाज बुलंद करणार आहेत.
या महालढ्याची रणनीती आखण्यासाठी आयोजित बैठकीस किनवट तालुक्यातील अनुसूचित जाती संवर्गातील सर्व कार्यकर्त्यांनी, विचारी नागरिकांनी आणि संघटनांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती (नांदेड), अखिल भारतीय भिक्खू संघ, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

COMMENTS