पंढरपूर: राज्यात शेकडो वर्षांपासून संतांनी आपल्या विचारांतून समाजप्रबोधन केले. सर्व संतांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश

पंढरपूर: राज्यात शेकडो वर्षांपासून संतांनी आपल्या विचारांतून समाजप्रबोधन केले. सर्व संतांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला आहे. हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व हवामान बदल विभागातर्फे आयोजित ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, पर्यावरण विभागाचा हा उपक्रम अतिशय चांगला असून प्राचीन काळापासून आलेले वैष्णवांचे हे विचार गावोगावी जाऊन पोहोचवले जात आहेत. सध्या जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न पर्यावरणाचा आहे. हा प्रश्न कोणतीही एक व्यक्ती एकटी सोडवू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमात संजय महाराज पाचपोरे यांनी कीर्तनातून, संध्याताई साकी यांनी भारुडातून तर शाहीर माळी यांनी पोवाड्यातून पर्यावरण जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कीर्तन व भारुडाचे ज्ञान जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रदूषण मंडळाचे सचिव राहुल रेखावार म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण थांबवण्यासाठी १९७० पासून प्रयत्न करत आहे. सन २०१० पासून ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. राज्यात १ लाख ३४ हजार उद्योग कार्यरत असून या उद्योगांमुळे प्रदूषण होऊ नये म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे, तसेच उद्योगांकडून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावरही नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS