Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?

मंत्री विखेंचा आ. लंकेंना बोचरा सवाल

अहमदनगर/प्रतिनिधी ः पालकमंत्री मी असल्याने माझ्यावर टीका करण्याचे काम विरोधकांचे आहेच व तसे त्यांना स्वातंत्र्यही आहे. पण इश्यू वा नॉन इश्यू अस

जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला
अब्दुल सत्तार भावणिक माणुस आहे  – राधाकृष्ण विखे पाटील
सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील यांचं उत्तर

अहमदनगर/प्रतिनिधी ः पालकमंत्री मी असल्याने माझ्यावर टीका करण्याचे काम विरोधकांचे आहेच व तसे त्यांना स्वातंत्र्यही आहे. पण इश्यू वा नॉन इश्यू असे काही पाहिलेही पाहिजे. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी नगरला येऊन काय केले? केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाच फोन लावला ना? शिवाय, त्यांनी (गडकरी) त्यांना (पवार) जे सांगितले, तेच गडकरींनी नगरला उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्यावेळीही सांगितलेच होते. महामार्गांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, असेच त्यांनी आताही सांगितले व त्यावेळीही सांगितले होतेच. पण काहींना राजकीय स्टंटबाजी करायची होती, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपोषण आंदोलनावर शनिवारी केली.

नगरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विखे यांचे संपर्क कार्यालय झाले असून, त्याच्या उदघाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पारनेरचे आ. लंके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातून जाणार्‍या तीन महामार्गांच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपोषण सोडवण्यासाठी नगरला आले होते व त्यावेळी त्यांनी नगरमधून केंद्रीय मंत्री गडकरींना फोन लावला होता. त्यानंतर लंके यांचे उपोषण सुटले. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मंत्री विखे यांनी आ. लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काहींना राजकीय स्टंटबाजी करायची असते. माझ्यावर आरोपांचे वा टीकेचे स्वातंत्र्य विरोधकांना आहेच. पण ते उपोषण सोडण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी येथे येऊन काय केले तर गडकरींनाच फोन लावला ना? आणि गडकरींनी त्यांना त्यावेळी रस्त्यांची कामे सुरू असल्याचे जे सांगितले, तेच गडकरींनी उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्यावेळीही सांगितलेच होते. मग उपोषण करून वेगळे काय साध्य केले?, अशी टीका मंत्री विखेंनी आ. लंकेंवर केली. दरम्यान, यावेळी मंत्री विखेंनी राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे यांच्यावरही टीका केली. राहुरीतील धर्मांतर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. राहुरीच्या पोलिस निरीक्षकांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विधीमंडळ सभागृहात विषय झाला आहे. पण यात, अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्यासारखा काहीही प्रकार नाही. पण तेथील (राहुरी) महाविकास आघाडीच्या आमदारांना वाटते की, आपली सत्ता गेल्याने आपले खच्चीकरण होत आहे. त्याला आपण काय करणार? असे उपरोधिक भाष्यही विख़ेंनी केले.

किल्ला मिल्ट्रीमुक्त करणार – नगरचा भुईकोट किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा किल्ला मिल्ट्रीमुक्त करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मिल्ट्रीने या किल्ल्याचा मालडेपो केला आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व असल्याने तो पर्यटन विकासाच्यादृष्टीने सर्वांसाठी खुला करण्याचे प्रयत्न आहेत, असे सांगून मंत्री विखे म्हणाले, सिव्हील रुग्णालयात मागच्यावर्षी लागलेल्या आगीचा अहवाल विधान भवनाच्या पटलावर ठेवण्याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हा अहवाल जनतेसमोर आणला जाणार आहे. सिव्हील आग प्रकरणी कोणी ढिलाई केली असेल वा कोणी निष्काळजीपणा केला असेल तरी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न शासनस्तरावरून होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट होणार – जिल्ह्यात शिर्डी-शनि शिंगणापूरसह अनेक देवस्थाने असल्याने रिलिजन टुरिझम, रतनगड-हरिश्‍चंद्रगड-भंडारदरा व सह्याद्रीच्या रांगा असल्याने अ‍ॅडव्हेंचर टुरिझम आणि औद्योगिक वसाहतींतील मोकळे भूखंड व बंद पडलेले कारखाने आणि या वसाहतींजवळील शासकीय भूखंडांवर आयटी पार्क व अन्य औद्योगिक कंपन्यांच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. यासाठी राज्याच्या गुंतवणूक व आयटी कक्ष कन्सल्टन्सीच्या मदतीने याबाबत जिल्ह्याचे प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग, सूरत-चेन्नई महामार्ग, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग, नवा औरंगाबाद-पुणे व मालेगाव-करमाळा महामार्ग जात असल्याने जिल्ह्याची रोड कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. शिर्डी विमानतळावर 300 कोटीची नवी इमारतही होत आहे. अशा स्थितीत पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाईल व यातून रोजगार निर्मितीला चालना दिली जाईल, असेही मंत्री विखेंनी सांगितले. मी स्वप्न दाखवत नाही तर प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा भर असतो, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

स्वयंशिस्त म्हणून मास्क वापरा – कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बहुतांश मोठ्या देवस्थानांमध्ये भाविकांना मास्क सक्ती केली आहे. शासनाने अजून तसा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दीच्या ठिकाणी जाणार्‍या प्रत्येकाने मास्क लावला पाहिजे. नागरिकांनी स्वयंशिस्त म्हणून मास्क वापर सुरू करावा, असे आवाहन करून मंत्री विखे म्हणाले, जिल्हाभरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने रोजगार क्षमता निर्माण करणार्‍या संस्था उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. अशा संस्थांना सरकारद्वारे जमीन व एक खिडकी योजनेतून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत. रोजगार निर्माण करणे हे आव्हान असल्याने त्यासाठी सर्वांची मदत घेतली जाणार आहे व त्यांनाही आवश्यक ती मदत शासनाद्वारे केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS