पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ९९ एकदिवसीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्र

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ९९ एकदिवसीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि आयोजकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाचा उत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित न राहता देशभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ९९ एकदिवसीय साहित्य संमेलनांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील मराठी साहित्यप्रेमींना या उपक्रमातून सहभागी होता येणार आहे.
शंभराव्या साहित्य संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा प्रतिष्ठानचे विश्वस्त राजेश पांडे यांनी सांगितले की, पूर्वी साहित्य संमेलने भरलेल्या विविध शहरांमध्ये ही एकदिवसीय संमेलने घेण्यात येतील. प्रत्येक ठिकाणी स्थानिक साहित्यिक, कवी, लेखक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग राहील. स्थानिक साहित्यपरंपरा जपत ही संमेलने शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी जोडली जातील. रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत साहित्य परिषदेशी संलग्न विविध शाखांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि संयोजक सहभागी होणार आहेत. संमेलनांचे नियोजन, कार्यक्रमांची रूपरेषा, स्थानिक स्तरावरील सहभाग, जनजागृती आणि समन्वय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांच्या साहित्यनिर्मितीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यभरातून सुमारे १७० निमंत्रित प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांचे वेळापत्रक, स्थळे आणि कार्यक्रमांची माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे. ही संमेलने १४ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत पार पडतील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि जनसहभागातून साजरे करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS