कोपरगाव: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येसगाव येथील ४० महिला भाविकांना आरामबसद्वारे पंढरपूर वारीसाठी रवाना करण्यात आले. संजीवनी युनिव्हर्सिट

कोपरगाव: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येसगाव येथील ४० महिला भाविकांना आरामबसद्वारे पंढरपूर वारीसाठी रवाना करण्यात आले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या पुढाकारातून हा भक्तिमय उपक्रम आयोजित करण्यात आला. वारीसाठी रवाना होण्यापूर्वी कोल्हे दांपत्याने सर्व महिला भाविकांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सुखरूप व मंगलमय वारीसाठी प्रार्थना केली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, येसगावला समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे जन्मगाव म्हणून येसगावची स्वतंत्र ओळख आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनासाठी त्यांनी नेहमीच योगदान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी गावातील ग्रामस्थ समर्थपणे पार पाडत आहेत. या पवित्र आषाढी वारीसाठी महिला भाविकांना निरोप देताना कोल्हे परिवाराला विशेष आनंद होत आहे.
या उपक्रमामुळे महिला भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनी कोल्हे दांपत्याचे आभार मानत, अशा सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली. येसगावातून विठ्ठलाच्या नामघोषात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आरामबस पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रसंगी ग्रामस्थ, महिला भाविक आणि कोल्हे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS