मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत पहिली लाभा

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत पहिली लाभार्थी यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राज्यातील ५५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मंत्री पाटील म्हणाले की, ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यास सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची नावेही टप्प्याटप्प्याने जाहीर केली जातील. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे १२ लाख शेतकऱ्यांना सुरुवातीला ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचा विचार होता. मात्र शासनाने निर्णयात बदल करून प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे ४ हजार ३९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, इतर घटकांसह या योजनेचा एकूण आर्थिक भार ४० हजार ९८० कोटी रुपये इतका असल्याची माहिती त्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये अमरावती ५८ शेतकरी, लातूर १३३ शेतकरी, नागपूर १६ शेतकरी, पुणे ८५ शेतकरी, सातारा ३८ शेतकरी आणि ठाणे १८२ शेतकरी अशा ५५३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या ५५३ शेतकऱ्यांचे एकूण २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये कर्ज माफ करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीची संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आयकर विभागाकडून आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात मर्यादित संख्येतील शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. आवश्यक माहिती प्राप्त होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळणार
या योजनेत शेतीव्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणार्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतर पात्रता निश्चित करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांना लाभाचा अंदाज
या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या २३.६३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ या दोन्हीच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक दिलासा मिळेल, असा शासनाचा दावा आहे.

COMMENTS