किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तात्काळ उपलब्ध करून पात्र आदिवासी उ

किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तात्काळ उपलब्ध करून पात्र आदिवासी उमेदवारांची गुणवत्तेनुसार भरती करा, अशी ठाम मागणी आमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त (प्राथमिक) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. रिक्त पदे न भरल्यास पात्र आदिवासी उमेदवारांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या अधिक वृत्त असे की, अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य देणे बंधनकारक आहे. आ. केराम यांनी आपल्या निवेदनात भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 244(1), पाचवी अनुसूची, पेसा अधिनियम 1996, पेसा नियम 2014आणि 4 मे 2026 च्या मार्गदर्शक सूचनांचा स्पष्ट संदर्भ दिला आहे. शिक्षण आयुक्तांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 च्या गुणवत्तायादीच्या आधारे उर्वरित रिक्त पदे भरणे बंधनकारक होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात अजूनही अनेक पदे उपलब्ध करून न दिल्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे आमदारांनी निदर्शनास आणले. किनवट-माहूर हा अनुसूचित जमातीबहुल भाग असल्याने येथील शेकडो आदिवासी युवक-युवती शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने स्वतःच्याच धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि या उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. केराम यांनी शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे.

COMMENTS