आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्या वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्या वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला ‘चरणसेवा’ उपक्रम गेवराई व परळी येथे उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला.
बुधवार, दि. 8 जुलै 2026 रोजी चिंतेश्वर मंदिर, गेवराई तसेच टीपीएस कॉलनी, परळी येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताईनगर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताबाई पालखी दिंडी तसेच शेगाव येथून निघणारी गजानन महाराज पालखी दिंडी बीड जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असताना शेकडो वारकरी पायी वारी करत होते. या वारकर्यांना प्रवासातील शारीरिक थकवा कमी करण्यासाठी ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयराजे पंडित यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबईचे विशेष कार्य अधिकारी तथा कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे 70 स्वयंसेवकांच्या पथकाने 400 पेक्षा अधिक वारकर्यांना चरणसेवा दिली. यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी वारकर्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले. फिजिओथेरपी, आयुष उपचार पद्धती तसेच पंचकर्म उपचारांचाही अनेक वारकर्यांनी लाभ घेतला. पायी प्रवासामुळे आलेला पायांचा त्रास, स्नायूंचा ताण आणि शारीरिक थकवा कमी झाल्याने वारकर्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील प्रवासासाठी नवचैतन्य व ऊर्जा मिळाल्याची भावना अनेक वारकर्यांनी व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुरु माऊली आयुर्वेदिक महाविद्यालय, माळीपरगाव (ता. माजलगाव), आर. बी. अट्टल महाविद्यालय गेवराई, जय भवानी महाविद्यालय गढी येथील एनएसएस विद्यार्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद बीड यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य कागदे, समन्वयक गणेश गिराम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कदम, डॉ. पिंगळे, गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय गोंदीकर, परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे तसेच अशोक लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वारकर्यांच्या आरोग्यसेवेला प्राधान्य देणारा हा ‘चरणसेवा’ उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण ठरला असून भविष्यातही अशा स्वरूपाचे उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा आयोजकांचा मानस आहे.

COMMENTS