मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सलग घडामोडींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असली, तरी या भेटींच्या उद्देशाबाबत कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी राज्यात नव्हे तर केंद्रात देखील नवे राजकीय समीकरण बघायला मिळू शकतात.
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वी काही खासदारांना एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील शीर्षस्थ नेते आग्रही आहे. त्यामुळेच राज्यात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी शरद पवार विधानभवनात आले होते. बैठकीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होते. पवार आल्याची माहिती मिळताच शिंदे काही काळासाठी बैठक सोडून बाहेर आले आणि त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार केला. यानंतर शरद पवार यांनी त्याच दालनात आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. या संपूर्ण घडामोडींची चित्रफीत आणि छायाचित्रे सार्वजनिक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. या भेटीनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त करत, शरद पवार यांनी शिंदे यांच्या दालनात जाणे योग्य नव्हते, असे मत मांडले. त्यामुळे विरोधी आघाडीत समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले असून या वादाचा राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आणखी काही लोकप्रतिनिधी पक्षांतर करू शकतात, अशा चर्चांमुळे ठाकरे गटाने पक्षांतर्गत बैठका घेऊन संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने आमदारांशी संवाद सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दिल्ली दौर्यानंतर चर्चांना आणखी वेग
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, आगामी संघटनात्मक बदल आणि केंद्र-राज्य समन्वयासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या बैठकीबाबतही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही रंगल्या
राज्यातील या राजकीय हालचाली सुरू असतानाच केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू असून त्यामुळे विविध पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

COMMENTS