दैनिक जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भोकर तालुक्यातील पत्रकारांनी केली

दैनिक जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भोकर तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांना पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले असून, त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक जगमित्रने सातत्याने जनहिताचे प्रश्न आणि कथित गैरव्यवहार लोकांसमोर मांडण्याचे काम केले आहे. राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी यांच्या कथित कारभारासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्याचाच राग मनात धरून त्यांच्या सहाय्यकामार्फत संपादक बालासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेला पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही मूल्यांवर आघात करणारी बाब संबोधत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जनहितासाठी आणि सत्याच्या बाजूने काम करणार्या पत्रकारांवर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, तर ते पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी गंभीर धोका असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर एल. ए. हिरे, बी. आर. पांचाळ, राजेश वाघमारे, जयभीम पाटील, शेख लतीफ, सिद्धार्थ जाधव, शंकर कदम, शेख एजाज, शिवाजी गायकवाड, सुभाष तेले, कैलास कानिदे, मनोज शिंदे आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्या आहेत. पत्रकारांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षाही पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.
मुख्य मागण्या
बालासाहेब कडबाने यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा., प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी., पत्रकारांवरील दबावाचे प्रकार थांबवावेत., अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे.
———–

COMMENTS