रायगड/अलिबाग : पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, सतत वाढणारा भूस्खलनाचा धोका आणि दरडी कोसळण्याच्या

रायगड/अलिबाग : पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, सतत वाढणारा भूस्खलनाचा धोका आणि दरडी कोसळण्याच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट 7 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर हा राज्य मार्ग अतिसंवेदनशील असून या परिसरात दरडी कोसळण्याचे आणि भूस्खलन होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती सैल झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जीविताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. यापूर्वीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून 3 जुलै ते 6 जुलै या कालावधीत आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही पावसाचा जोर कमी न झाल्याने आणि काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्याने संबंधित विभागांनी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच पोलादपूर तहसील प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात घाट परिसरातील धोका अद्याप कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाडचे उपविभागीय अधिकारी यांनीही संभाव्य अपघात टाळण्यासाठी आंबेनळी घाट दीर्घ कालावधीसाठी वाहतुकीस बंद ठेवण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या सर्व अहवालांचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 7 जुलैपासून 31 जुलैपर्यंत आंबेनळी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना घाटमार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.

COMMENTS