विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळावे आणि बँकिंग व्यवस्थेची ओळख व्हावी, या उद्देशाने नांदेड येथील बोरबन परि

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळावे आणि बँकिंग व्यवस्थेची ओळख व्हावी, या उद्देशाने नांदेड येथील बोरबन परिसरातील सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी बँकेच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विविध बँकिंग सेवांची माहिती जाणून घेतली. इयत्ता पहिली ते पाचवी चे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी शाळेचे संचालक जयेंद्र बरारा तसेच प्राचार्या डॉ. अमन बरारा यांनी विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये अनुभवाधारित शिक्षणाला विशेष महत्त्व असून, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि व्यवहारकुशलता विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेतील अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना खाते उघडण्याची प्रक्रिया, ठेवी, पैसे काढणे, कर्ज सुविधा, डिजिटल बँकिंग, एटीएम सेवा, ऑनलाइन व्यवहार तसेच ग्राहकांना दिल्या जाणार्या विविध सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली. याशिवाय बँकेतील संगणकीय प्रणाली, दस्तऐवज पडताळणी आणि सुरक्षित व्यवहाराची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून बँकिंग व्यवस्थेबाबत उत्सुकता व्यक्त केली. ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी शिक्षिका कानुपात्रा भाकरे (मधू), भाग्यश्री हाळीकर, हरप्रीत कौर लोहिया, जसनदीप कौर तबेलेवाले आणि जगप्रीत कौर जिलदार यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती मिळाली तसेच बँकेतील आर्थिक व्यवहारांविषयीची प्राथमिक समज अधिक दृढ झाली. शाळेकडून भविष्यातही अशा अनुभवाधारित आणि कौशल्यविकासाला चालना देणार्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. अमन बरारा यांनी दिली.

COMMENTS