नांदेड : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नांदेड महानगरपालिका प्

नांदेड : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नांदेड महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शनिवारी शहरातील पूरप्रवण, सखल व नदीकाठच्या संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला.
आयुक्तांनी उर्दू घरा परिसरातील नाला, असदवन ते लातूर फाटा नाला, रवीनगर ते कौठा पोलीस चौकी तसेच शगुन सिटी परिसराची पाहणी केली. शगुन सिटीतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नाल्यांची स्वच्छता, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करत संबंधित अधिकार्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये, यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचारी व यंत्रसामग्री तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष तीन शिफ्टमध्ये 24 तास कार्यरत ठेवण्यासह सर्व झोनल अधिकारी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पाणी साचणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 02462-242803 किंवा 02462-235077 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पाहणी दौर्यात अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, कनिष्ठ अभियंता ठाणेदार आदी उपस्थित होते.

COMMENTS