Homeताज्या बातम्या

कोणीही या, फ्युज टाकून जा…उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात

नांदेड : शहरातील अनेक भागांमध्ये महावितरणचे वीज ट्रान्सफॉर्मर संरक्षणाविना उघडे पडले असून त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्णा

पिण्याचे अस्वच्छ पाणी हॉटेलमध्ये दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरजहॉटेल, गाड्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर
एटीएम केंद्रे सुरक्षेविना; नागरिकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण


नांदेड : शहरातील अनेक भागांमध्ये महावितरणचे वीज ट्रान्सफॉर्मर संरक्षणाविना उघडे पडले असून त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्णा रोड, काबरानगर, पावडेवाडी नाका, आनंदनगर, श्रीनगर, विवेक नगर, वजीराबाद आदी परिसरातील अनेक ट्रान्सफॉर्मरचे दरवाजे सताड उघडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती ट्रान्सफॉर्मरजवळ सहज पोहोचून फ्युज टाकणे, दार उघडणे किंवा इतर छेडछाड करू शकते. महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचा पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अत्यंत संवेदनशील मानले जातात. अशा ठिकाणी अधिकृत कर्मचार्‍यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसावा, अशी नियमावली असतानाही अनेक ठिकाणी कुलूप नसलेले किंवा तुटलेले दरवाजे पाहायला मिळत आहेत. यामुळे लहान मुले, भटक्या जनावरांचा वावर तसेच असामाजिक घटकांकडून होणारी छेडछाड यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काहीजण स्वतःच ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्युज टाकण्याचा प्रयत्न करतात. ही बाब अत्यंत धोकादायक असून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही महावितरणकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, शहरात पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ट्रान्सफॉर्मर परिसरात पाणी साचण्याचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत उघडे ट्रान्सफॉर्मर अधिकच धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सर्व ट्रान्सफॉर्मरना मजबूत कुलपे, सुरक्षा जाळी आणि इशारा फलक तातडीने बसवावेत, तसेच नियमित तपासणी करून निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महावितरणने संभाव्य अपघाताची वाट न पाहता शहरातील सर्व उघड्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा तो टाळण्यासाठी वेळेत उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

COMMENTS