Homeताज्या बातम्या

पावसाचा रेड अलर्ट; आयुक्त मैदानात, महापौर कुठे? शहराच्या सुरक्षेवरून नवा सवाल

नांदेड : भारतीय हवामान विभागाने नांदेडसह मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डो

मुसळधार पावसाच्या इशार्‍यानंतर मनपा सतर्कआयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी संवेदनशील भागांची केली पाहणी
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क


नांदेड : भारतीय हवामान विभागाने नांदेडसह मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने क्शन मोडमध्ये जात शहरातील पूरप्रवण आणि संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र या संपूर्ण घडामोडीत शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा सहभाग किंवा उपस्थिती दिसून न आल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शनिवारी सकाळपासूनच आयुक्तांनी उर्दू घर परिसर, असदवन ते लातूर फाटा नाला, रवीनगर, कौठा पोलीस चौकी, शगुन सिटीसह विविध सखल भागांची पाहणी केली. नाल्यांमधील अडथळे, पाणी वाहून जाण्याचे मार्ग, संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेत त्यांनी अधिकार्‍यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले. अतिरिक्त सफाई कर्मचारी, यंत्रसामग्री तैनात करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्याचे आणि सर्व झोनल अधिकारी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. दुसरीकडे, शहरावर संभाव्य संकटाचे सावट असताना महापौर मात्र कुठेच दिसून न आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी, पूरप्रवण भागातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी किंवा प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी महापौर पुढाकार घेताना दिसल्या नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनीही मैदानात उतरून जनतेचा विश्वास वाढवणे अपेक्षित असते. संकटाच्या काळात नेतृत्व दिसणे ही केवळ औपचारिकता नसून लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यामुळे आयुक्त प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत असताना महापौरांच्या अनुपस्थितीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आयुक्तांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे प्रशासन सज्जतेचा दावा करत प्रत्यक्ष कामाला लागले आहे, तर दुसरीकडे शहराच्या राजकीय नेतृत्वाची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीही तितक्याच सक्रियतेने मैदानात उतरणार का, हा प्रश्न आता शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS