मुंबई : देशभरात मान्सूनने जोर धरला असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार
मुंबई : देशभरात मान्सूनने जोर धरला असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. नद्या, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील झेनिथ धबधब्यावर पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे शंभर पर्यटक अडकून पडले होते. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे पावसाळ्यात पर्यटनस्थळी खबरदारी घेण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक भागांमध्ये रस्त्यांचे स्वरूप नदीसारखे झाले असून सुमारे वीस वाहने पाण्यात अडकली किंवा बुडाली. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई शहरातही पावसाचा तडाखा कायम असून विविध भागांत 64 झाडे कोसळली, तर आठ घरांच्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासन सतर्क आहे. पुण्यातील कात्रज भागात सततच्या पावसामुळे एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळली. ही भिंत वाहनतळावरील शेडवर पडल्याने सात मोटारी आणि सात दुचाकींचे मोठे नुकसान झाले. तसेच शहरातील दुसर्या घटनेत इमारतीची भिंत कोसळून दोन कामगार जखमी झाले. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात मुसळधार पावसामुळे मेट्रो मार्गाच्या खांबाजवळ भूस्खलन झाले. रस्त्यावर माती व दगडांचा ढिगारा साचल्याने खारघरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS