श्रीगोंदा : वटपौर्णिमेनिमित्त श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या साळवन देवी मंदिर परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने वटवृक्षाचे पूजन करून महिलांना राजमाता

श्रीगोंदा : वटपौर्णिमेनिमित्त श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या साळवन देवी मंदिर परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने वटवृक्षाचे पूजन करून महिलांना राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांमध्ये सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मातृत्व, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी रायगडावरील हिरकणीच्या प्रसंगाचा उल्लेख करत मातृत्वाच्या त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची आठवण करून दिली. समाजात वाढत असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
ते म्हणाले, “राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांनी केवळ परंपरा जपल्या नाहीत, तर समाजाला दिशा दिली. त्यांनी वृक्षारोपण, मंदिरांचा जीर्णोद्धार, शिक्षणाचा प्रसार आणि समाजप्रबोधनाचे कार्य करत आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
वटपौर्णिमेनिमित्त महिलांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले, “पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाला सात फेरे मारता, ते अवश्य मारा; पण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या संस्कारांसाठी आणि शिक्षणासाठी प्रतीकात्मक दोन फेरेही मारा. त्यामुळे पुढील पिढी सुसंस्कृत, सुशिक्षित होऊन समाजात नाव कमावेल.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना महामातांच्या जीवनचरित्रावरील पुस्तके भेट देण्यात आली. महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमांची गरज व्यक्त केली. पुस्तक वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

COMMENTS