मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत युवक काँग्रेसने

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत युवक काँग्रेसने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आणि मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी झीनत शबरीन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर मंत्रालय आणि शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक
या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश शासनाने दिला आहे.
३७ शहरांतील १,०२८ केंद्रांवर परीक्षा पुन्हा होणार!
प्रश्नपत्रिका गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील ३७ शहरांमधील १,०२८ केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. या निर्णयाचा थेट फटका नोंदणी केलेल्या सुमारे ६ लाखांहून अधिक उमेदवारांना बसणार आहे. दरम्यान, भिवंडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले असून, शिक्षण विभागाच्या पडताळणीनंतर ते मूळ प्रश्नसंच असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

COMMENTS