सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब गुरुद्वार्याच्या व्यवस्थापनासाठी प्रस्तावित सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा अधिनियम 2026 रद्द करून त्याची अंमलबजावणी

सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब गुरुद्वार्याच्या व्यवस्थापनासाठी प्रस्तावित सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा अधिनियम 2026 रद्द करून त्याची अंमलबजावणी थांबवावी, तसेच या विषयावर विधानसभेत आवाज उठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शहर) जिल्हाध्यक्ष तथा बाबा फत्तेहसिंघजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे केली.
रोहित पवार यांच्या नांदेड दौर्यादरम्यान झालेल्या भेटीत ग्रंथी यांनी सांगितले की, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब गुरुद्वार्याचे व्यवस्थापन गेल्या सुमारे 70 वर्षांपासून गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 नुसार सुरू आहे. मात्र, हा कायदा रद्द करून त्याऐवजी नवीन अधिनियम लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, त्याला शीख समाजातून तीव्र विरोध होत आहे. नवीन कायद्यामुळे स्थानिक शीख समाजाचे प्रतिनिधित्व कमी होऊन गुरुद्वारा व्यवस्थापनावर बाह्य हस्तक्षेप वाढण्याची भीती समाजात व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला. शीख धर्मीयांकडून अशी कोणतीही मागणी नसतानाही हा कायदा आणला जात असल्याचे सांगत, समूह पंज प्यारे साहेबांनीही या प्रस्तावाविरोधात ठराव करून राज्य सरकारचा निषेध नोंदविल्याचे त्यांनी नमूद केले. शीख समाजाच्या भावना लक्षात घेऊन नवीन गुरुद्वारा बोर्ड कायद्याची अंमलबजावणी तातडीने थांबविण्यासाठी विधानसभेत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शीख सेलचे प्रदेशाध्यक्ष जरनैलसिंघ गाडीवाले, उपाध्यक्ष तरविंदरसिंघ बडगुजरा, लखनसिंघ लांगरी, प्रेमजीतकौर कोल्हापुरे, अमितसिंघ सुखमणी आणि जसबीरसिंघ हूंदल उपस्थित होते.

COMMENTS