Homeताज्या बातम्या

नागापूर (खुर्द) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता व विधी सेवा शिबिर संपन्न

बीड: ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (डीएलएसए), बीड यांच्या वतीने गुर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप

बीड: ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (डीएलएसए), बीड यांच्या वतीने गुरुवार, २५ जून २०२६ रोजी नागापूर (खुर्द) येथे एकदिवसीय विधी साक्षरता व विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. दिनेश पी. सुराणा आणि सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

महिला सुरक्षा आणि मोफत कायदेशीर मदतीवर सविस्तर मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय न्यायाधीश ए. एस. मुलानी हे होते. प्रारंभी सरपंच सौ. सुमेधा साळुंके यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर सूत्रसंचालन तत्वशील कांबळे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक एस. टी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश ए. एस. मुलानी यांनी महिला सुरक्षा कायदे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कल्याण याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात एकल महिला, ऊसतोड कामगार, वंचित घटक आणि वेठबिगार कामगार यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी बालकांचे हक्क, बालक संरक्षण कायदे आणि बालसुरक्षेच्या उपाययोजनांवर माहिती दिली. त्यांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकाचे महत्त्व सांगताना भारतीय संविधानाने प्रत्येक बालकाला शिक्षण आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क दिल्याचे स्पष्ट केले.

शासकीय योजना आणि राष्ट्रीय हेल्पलाइनचे आवाहन

यावेळी कमलेश देशमुख व विकास जगताप यांनी विधी साक्षरतेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नागरिकांना मोफत कायदेशीर मदत योजनांची माहिती देत नालसा (NALSA) च्या १५१०० या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनचा लाभ घेण्याचे आवाहन केले, तसेच विविध शासकीय योजनांमध्ये शासकीय ओळखपत्रांचे महत्त्वही स्पष्ट केले. आरोग्य विभागाचे डॉ. महेश सोनवणे यांनी आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे लाभ, निरोगी जीवनशैली आणि वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.

शिबिराला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आबेद अली देशमुख, सुधीर कदम, पोलीस पाटील दत्ता साळुंके तसेच परिसरातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामविकास अधिकारी के. एस. सानप यांनी उपस्थित अधिकारी, वक्ते आणि ग्रामस्थांचे आभार मानले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात कायद्याविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण झाली आहे.

COMMENTS