नांदेड : लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावातच वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महाव

नांदेड : लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावातच वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. गावात स्वतंत्र 33 के.व्ही. वीज उपकेंद्र कार्यरत असतानाही वारंवार होणार्या वीज खंडिततेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आष्टी गावठाण फिडर गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव बंद अवस्थेत आहे. परिणामी उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील इतर गावांमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाला तरी त्याचा फटका थेट आष्टी गावाला बसतो. अनेकदा तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने घरगुती कामकाज, व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 33 के.व्ही. उपकेंद्रामुळे गावाला अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट असून, वारंवारच्या वीज खंडिततेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, गावातील अनेक भागांत विजेच्या तारा धोकादायकरीत्या खाली लोंबकळत असल्याचे चित्र आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही महावितरणकडून आवश्यक ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, गणेशोत्सव तसेच दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकांसारख्या महत्त्वाच्या सण-उत्सवांदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र पर्यायी व्यवस्था उभारण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. स्थानिक कर्मचार्यांचे मुख्यालयी वास्तव्य नसणे आणि एका लाईनमनकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने तक्रारींचे वेळेवर निवारण होत नसल्याचेही समोर आले आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांना विचारणा केली असता, कर्मचारी संख्या अपुरी असून एका लाईनमनकडे अनेक गावांची जबाबदारी आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र या उत्तरामुळे नागरिकांचे समाधान झालेले नाही. खासदारांच्या मूळ गावातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आष्टी गावठाण फिडर तातडीने पूर्ववत सुरू करावा, धोकादायक तारांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता या गंभीर प्रश्नावर महावितरण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
आष्टी गावठाण फिडर तातडीने सुरू करावा., लोंबकळणार्या विजेच्या तारांची त्वरित दुरुस्ती करावी., अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी., अतिरिक्त लाईनमन व तांत्रिक कर्मचारी नियुक्त करावेत., सण-उत्सवांच्या काळात पर्यायी वीज व्यवस्थेची अंमलबजावणी करावी.
————-

COMMENTS