बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या अन्न माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने केज येथे मोठी धडक कारवाई करत तब्बल 6 लाख 68 हज

बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या अन्न माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने केज येथे मोठी धडक कारवाई करत तब्बल 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी तुकाराम मुंडे यांनी 17 जून रोजी केज येथील एका मिठाई उत्पादन युनिटची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान मिठाई निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त व मानवी आरोग्यास घातक परिस्थितीत साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच उत्पादन व साठवणुकीसंदर्भातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान पथकाने लिक्विड ग्लुकोज, खुला खवा (मावा), वनस्पती तूप (सूर्या गोल्ड), प्रीमियम गोल्ड हलवा (व्हाईट व ब्राऊन) तसेच विविध पारंपरिक मिठाई निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा (एफएसएसएआय) अंतर्गत फौजदारी अथवा अन्य कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाच्या विशेष पथकाने केली. सणासुदीच्या काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांची फसवणूक करणार्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणार्यांविरुद्ध अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

COMMENTS