अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी (दि. २१ जून) अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर नीट २०२६ पुनर्परीक्षा आयोजित करण्या

अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी (दि. २१ जून) अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर नीट २०२६ पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ५ हजार ३८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असून, दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे.
परीक्षेचे सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी तथा भरारी पथके, १२ कर्तव्य दंडाधिकारी, १०७ पोलीस कर्मचारी, २१ जिल्हा प्रशासनाचे अधिकारी – कर्मचारी आणि १२ वाहनचालक यांचा समावेश आहे.
परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, कर्तव्य दंडाधिकारी, निरीक्षक आणि भरारी पथकांमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रात अथवा परीक्षा कक्षात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, फिटनेस बँड, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, कॅमेरे, पेजर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पर्स, हँडबॅग, पुस्तके, वह्या, नोट्स, छापील साहित्य, सैल कागदपत्रे, जिओमेट्री बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, कोणतेही संप्रेषण साधन तसेच गैरप्रकारास मदत करणारे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. उमेदवारांनी केवळ एनटीएने परवानगी दिलेल्या वस्तू, प्रवेशपत्र आणि वैध छायाचित्रयुक्त ओळखपत्र सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहे मनुष्यबळ
१२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी तथा भरारी पथके, १२ कर्तव्य दंडाधिकारी, १०७ पोलीस कर्मचारी, २१ जिल्हा प्रशासनाचे अधिकारी – कर्मचारी आणि १२ वाहनचालक यांचा समावेश आहे.

COMMENTS