छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनु

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनुमान मंदिराजवळील एका दुमजली इमारतीत झालेल्या या दुर्घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे इमारतीतील इतर नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संबंधित इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी आस्थापने असून वरच्या मजल्यावर निवासी कुटुंबे राहत होती. पहाटे साडेचारच्या सुमारास तळमजल्यावरील एका दुकानातून आग लागल्याचे निदर्शनास आले. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. दुकानाच्या मागील भागात ठेवलेल्या गॅस सिलिंडरांपैकी एका सिलिंडरमधून गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के आजूबाजूच्या घरांनाही जाणवले. या दुर्घटनेत सुनंदा राजेंद्र मोरे (वय 45) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. धूर आणि ज्वाळांनी परिसर व्यापल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्याआधी परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून इमारतीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढले. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली. मृत महिलेचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. मात्र वेळेत प्रतिसाद न मिळाल्याने बचावकार्य अडचणीत आल्याचा आरोप करण्यात आला. लोंबकळणार्या वीजवाहिन्यांमुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे शहरात घरगुती गॅस सुरक्षितता, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

COMMENTS