कोपरगाव : मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस प्रशास

कोपरगाव : मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजना सुरू केली आहे. या योजनेतून मतदारसंघातील अधिकाधिक रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी आमदार काळे प्रयत्नशील होते. त्यातून ७.५ कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे.
अनेक गावांमध्ये पावसाळ्यात चिखल आणि पाण्यामुळे शेतपाणंद रस्ते वाहतुकीस अयोग्य ठरतात. परिणामी पेरणी, मशागत, काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी बैलगाडी व ट्रॅक्टरलाही शेतात जाणे कठीण होते. नव्याने होणाऱ्या रस्त्यांमुळे या समस्यांवर मोठ्या प्रमाणात मात होणार आहे.
या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात सहज ये-जा करता येणार असून पेरणी व काढणीच्या हंगामात शेतीमालाची वाहतूक अधिक वेगाने होईल. बाजारपेठेशी संपर्क सुलभ झाल्याने वाहतूक खर्चातही बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती व्यवस्थेला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

COMMENTS