Homeताज्या बातम्या

गोदावरी ‘शुद्ध’ की चाटूगिरीचा महापूर? प्रसिद्धी पत्रकावरून बातमीदारी करणार्‍यांच्या अकलेची नांदेडकरांना कीव!

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांनी न

४०० कोटींच्या घोषणेनंतरही नांदेड स्टेडियमचे भवितव्य अधांतरी; खेळाडूंमध्ये नाराजी वाढली
नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा
असर्जन नाका ते वाघाळा रस्ता ड्रेनेज खोदकामामुळे नादुरुस्त; नागरिकांचे हाल, तात्काळ दुरुस्तीची मागणी

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत. असे असताना काही पत्रकार मात्र महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकांनाच सत्याचा अंतिम पुरावा मानून गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्याचा गजर करत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांच्या समस्यांवर प्रश्न विचारण्याऐवजी सत्ताधार्‍यांची आणि अधिकार्‍यांची स्तुती करण्यात धन्यता मानणार्‍या या प्रवृत्तीवर आता उघडपणे टीका होत आहे.

पावसाळ्यापूर्वी गोदावरी नदीचे पात्र अत्यंत शुद्ध झाले असून शहरातील नालेदेखील शुद्ध पाण्याचाच विसर्ग करत आहेत, असा दावा महापालिकेच्या वतीने काही माध्यमांतून करण्यात आला. मात्र, हा दावा करणार्‍यांपैकी किती जणांनी प्रत्यक्ष गोदावरीच्या घाटांवर जाऊन पाहणी केली? समाजमाध्यमांवरून सध्याच्या गोदावरी नदीची दुरवस्था नागरिक स्वतः फोटो टाकून दाखवत आहेत. गोदावरी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर राष्ट्रीय हरित लवादात (NGT) याचिका न्यायप्रविष्ट असताना, नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाल्याचा डंका पिटण्यामागे नेमका कोणता हेतू आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नदीपात्रातील पाण्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण घटणे आणि सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग ही यामागील प्रमुख कारणे होती.

या गंभीर घटनेनंतरही नदी पूर्णपणे शुद्ध झाल्याचे दावे करणे म्हणजे वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अपूर्ण क्षमतेने चालणारे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) आणि पावसाळ्यात वाढणारा प्रदूषित पाण्याचा प्रवाह यामुळे गोदावरी नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेचे प्रश्न मांडणे, सत्ताधार्‍यांच्या दाव्यांची चिकित्सा करणे आणि वास्तव लोकांसमोर आणणे हीच खरी पत्रकारिता आहे. मात्र, काही मंडळींनी या मूल्यांनाच तिलांजली देत ‘पित-पत्रकारिता’चा (Yellow Journalism) नवा आदर्श निर्माण केला आहे, अशी उपरोधिक टीका आता नांदेडकरांमधून उघडपणे होत आहे.

COMMENTS