मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडवस्तींपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली

मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडवस्तींपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आधुनिक नागरी सुविधा, सुसज्ज निवास व्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारी विकासरचना उभारून धारावीचा सर्वांगीण कायापालट करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. 2028 पर्यंत पहिल्या टप्प्यात किमान दहा हजार घरे पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या विविध बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पुनर्विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचे हित, त्यांची उपजीविका आणि धारावीची सामाजिक-आर्थिक ओळख जपण्यावर विशेष भर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, धारावीचा विकास हा केवळ उंच इमारती उभारण्याचा उपक्रम नसून तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा व्यापक प्रयत्न आहे. धारावीमध्ये हजारो लघुउद्योग, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रक्रियेत स्थानिकांच्या रोजगारावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. बैठकीत प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन गृहनिर्माण उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मार्च 2028 पर्यंत किमान दहा हजार घरे पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आवश्यक प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळाव्यात यासाठी स्वतंत्र एकात्मिक मंजुरी कक्ष स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे धारावीत उभारण्यात येणारे अत्याधुनिक बहुविध वाहतूक केंद्र. या केंद्राद्वारे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांसह विविध भूमिगत व उन्नत रेल्वे मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सुसंगत आणि सुलभ होण्यास मदत मिळणार आहे. याशिवाय हवाई प्रवाशांसाठी शहरातच प्रवासपूर्व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे.
मुंबईच्या विकासाला नवी दिशा
धारावी पुनर्विकास योजना ही देशातील सर्वात मोठ्या नागरी पुनर्रचना उपक्रमांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेल्या या प्रकल्पाला आता वेग मिळत असल्याचे चित्र आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धारावी आधुनिक निवास व्यवस्था, व्यावसायिक संधी आणि सक्षम वाहतूक सुविधांनी सुसज्ज अशा जागतिक दर्जाच्या नागरी केंद्रात रूपांतरित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS