साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी सहधर्मादाय आयुक्त हिराताई शेळके यांनी गुरुवार,
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी सहधर्मादाय आयुक्त हिराताई शेळके यांनी गुरुवार, दि. 4 जून रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. शासनाच्या देवस्थान विषयक नवीन धोरणानुसार त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संस्थानच्या कामकाजाचा आढावा घेतला.
पदभार स्वीकारण्यापूर्वी हिराताई शेळके यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन विधीवत पूजा-अर्चना केली तसेच महाआरतीत सहभागी होत देवीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी संस्थानच्या प्रशासनिक आणि धार्मिक कार्यांचा आढावा घेत संबंधित पदाधिकार्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव तसेच संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांबाबत व दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर परिसरातील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत हिराताई शेळके यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. सन 2014 पासून श्री रेणुकादेवी संस्थानचा कारभार जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष, सहाय्यक जिल्हाधिकारी सचिव, उपविभागीय पोलीस अधिकारी उपाध्यक्ष, तहसीलदार कोषाध्यक्ष तसेच सात अशासकीय विश्वस्तांच्या माध्यमातून चालविला जात आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार आता सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी हिराताई शेळके यांनी स्पष्ट केले की, सध्याचे पदसिद्ध पदाधिकारी आणि अशासकीय विश्वस्त यांचा कार्यकाळ पूर्ववत राहणार असून ते 2029 पर्यंत संस्थानच्या व्यवस्थापनात कार्यरत राहतील. त्यांच्या नियुक्तीमुळे संस्थानच्या प्रशासनाला अधिक गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS