जामखेड : दारूच्या नशेत आपत्कालीन मदत क्रमांकावर खोटा दूरध्वनी करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी खर्डा पोलिसांनी सागर श्रीधर ढोले (रा. कुटेवस्त

जामखेड : दारूच्या नशेत आपत्कालीन मदत क्रमांकावर खोटा दूरध्वनी करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी खर्डा पोलिसांनी सागर श्रीधर ढोले (रा. कुटेवस्ती, वंजारवाडी, ता. जामखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर दूरध्वनी करून, “काही जणांनी लोखंडी रॉड, तलवार आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली असून तातडीने पोलिस मदत हवी आहे,” अशी माहिती देण्यात आली होती.
ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी प्रविण थोरात, जी. डी. इंगावले, बी. एल. पालवे तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी शासकीय वाहनातून तातडीने वंजारवाडीकडे धाव घेतली.
मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर सागर ढोले हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. तो असंबद्ध बोलत होता तसेच त्याच्या श्वासातून मद्याचा तीव्र वास येत होता. चौकशीदरम्यान त्याचे वडील श्रीधर ढोले व आई जयश्री ढोले यांनी सागर हा वारंवार मद्यपान करून पत्नी, मुले आणि आई-वडिलांना मारहाण करतो, घरातील वस्तूंची तोडफोड करतो तसेच आपत्कालीन मदत क्रमांकावर खोटे दूरध्वनी करीत असल्याचे सांगितले.
पोलिस मदतीसाठी पोहोचताच तो भ्रमणध्वनी बंद करून पळून जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. वैद्यकीय तपासणीत सागर ढोले मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे निष्पन्न झाले.
खोटी माहिती देऊन पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणे, शासकीय यंत्रणेचा वेळ व संसाधने विनाकारण खर्ची घालणे आदी कारणांमुळे पोलिस कर्मचारी प्रविण थोरात यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपत्कालीन मदत क्रमांक ११२ ही नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठीची सेवा आहे. या क्रमांकावर खोटी माहिती देणे किंवा विनाकारण वारंवार दूरध्वनी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

COMMENTS