श्रीगोंदा : आमदार विक्रम पाचपुते यांनी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सांगली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती आमद

श्रीगोंदा : आमदार विक्रम पाचपुते यांनी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सांगली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती आमदार पाचपुते यांनी सामाजिक माध्यमांद्वारे जाहीर केली असून, संभाजी भिडे यांचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासासह भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची भावना समाजात रुजविण्यासाठी संभाजी भिडे यांनी अनेक दशकांपासून केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम या विषयांवर त्यांनी सातत्याने केलेले प्रबोधन समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार पाचपुते यांनी म्हटले आहे.
युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यसंवर्धन, इतिहासाविषयी अभिमान आणि समाजाप्रती कर्तव्यभावना निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशभरात शिवचरित्र, स्वराज्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी उभारण्यात आलेले कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरल्याचे पाचपुते यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजातील बदलती परिस्थिती, युवकांची भूमिका, संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज तसेच राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याच्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी संभाजी भिडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.
दरम्यान, या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून त्यांच्या या भेटीकडे श्रीगोंदा तालुक्यासह राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS