बंगळुरू : कर्नाटकमधील नव्या मंत्रीमंडळातील खातेवाटपानंतर निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद उमटू लागले असून ज्येष्ठ काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी या

बंगळुरू : कर्नाटकमधील नव्या मंत्रीमंडळातील खातेवाटपानंतर निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद उमटू लागले असून ज्येष्ठ काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत सरकारसमोर नवे राजकीय आव्हान उभे केले आहे. खातेवाटपात अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असून त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अलीकडेच मंत्रीमंडळातील सदस्यांना विविध खात्यांचे वाटप केले. त्यामध्ये रामलिंगा रेड्डी यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांना बंगळुरू विकास विभागाची अपेक्षा होती. याच मुद्द्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना रेड्डी यांनी स्पष्ट केले की, त्यांनी केवळ मंत्रीपदाचा त्याग केला असून पक्षाशी असलेले नाते कायम आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अंतरात्म्याच्या विरोधात काम करणे मला मान्य नाही. त्यामुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आमदार म्हणून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका कायम राहील, असे त्यांनी म्हटले. रामलिंगा रेड्डी हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी नेते मानले जातात. गेली पाच दशके ते काँग्रेसशी जोडलेले आहेत. पक्षाने विविध काळात त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवल्या असून त्यांनी अनेक सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. मंत्रीपदासाठी आपण कधीही आग्रह धरला नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. सूत्रांच्या माहितीनुसार, खातेवाटपाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान रेड्डी यांनी आपली नाराजी थेट नेतृत्वापुढे व्यक्त केली होती. बैठकीदरम्यान त्यांनी अपेक्षित विभाग न मिळाल्याबद्दल आक्षेप घेतला आणि काही वेळाने बैठक सोडून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. 2023 मध्ये मंत्रीमंडळ फेरबदल झाल्यास बंगळुरू विकास विभागाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची आठवणही त्यांनी नेतृत्वाला करून दिल्याचे वृत्त आहे.

COMMENTS