मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले.

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते यकृताशी (लीव्हर) संबंधित आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर त्यांनी राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून अनेक कलाकार, निर्माते आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
चित्रपट कामगार महासंघाचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी निहलानी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
गोविंदा आणि चंकी पांडे यांना दिली पहिली संधी: पहलाज निहलानी यांनी १९८२ साली “हथकडी” या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती करत स्वतंत्र ओळख निर्माण केली. “आंखें”, “अंदाज”, “शोला और शबनम”, “पाप की दुनिया”, “इल्जाम”, “तलाश”, “मिट्टी और सोना”, “आग ही आग”, “गुनाहों का फैसला”, “रंगीला राजा” आणि “जुली २” यांसारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
अनेक कलाकारांच्या कारकिर्दीच्या घडणीत निहलानी यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. अभिनेता गोविंदा यांना “इल्जाम” चित्रपटातून मोठी संधी देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. तसेच अभिनेता चंकी पांडे यांनाही त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी उपलब्ध करून दिली. गोविंदा आणि दिव्या भारती यांची जोडी असलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. त्यांच्या निर्मितीतील “आंखें” हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता.

COMMENTS