नांदेड : राज्यातील 17 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती मध्ये जागा वाटपावरून अंतर्गत धुसफूस चालू आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी

नांदेड : राज्यातील 17 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती मध्ये जागा वाटपावरून अंतर्गत धुसफूस चालू आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय व मॅनेजमेंट गुरु समजले जाणारे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे महायुतीच्या विरोधामध्ये सूर आळवतात. नंतर मात्र सर्व काही त्याचे पॅच अप कसे काय होते? असा प्रश्न मतदारांना पडतो.
महायुती म्हणून नांदेड जिल्ह्यात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाला एकत्र निवडणूक लढविण्याची गरज असताना प्रत्येक वेळेला वेगळा संसार मांडण्याची गरज का भासते? विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी नाट्य आता थेट चव्हाट्यावर आले आहे. भाजपने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताच महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास बंद दाराआड खलबतं झाल्याने राजकीय वर्तुळात ’इनसाईड गेम’च्या चर्चांना उधाण आले आहे. ’मित्रपक्षांना डावलले जातेय’; अंतर्गत नाराजीचा स्फोट! या हाय-व्होल्टेज भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी महायुतीतील ’बिग ब्रदर’च्या भूमिकेवर थेट आक्षेप घेतले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना नेत्यांनी आपली खंत बोलून दाखविली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखालाच साधं निमंत्रण दिलं गेलं नाही. एकीकडे महायुती म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षांना डावलून विश्वासात घ्यायचं नाही, ही कसली महायुती? या निवडणुकीत मुकाबला झालाच पाहिजे, असं सर्वांचंच मत आहे.असे यावेळी राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार म्हणतात जिल्ह्यातील राजकारण सध्या अतिशय वेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीने चालवले जात आहे. युती असूनही काही ठराविक लोकांना हेतूपूर्वक डावलण्यात येतंय, अधिकृत कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. यामुळेच आम्ही एकत्र येऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली आहे. महायुतीमधील या उघड बंडखोरीवर विरोधकांनीही तत्परतेने निशाणा साधला आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, भाजपमध्ये सध्या सर्व काही अलबेल नाही, वरून वरून सर्व ठीक दिसत असले तरी आतून मोठी नाराजी आहे. भाजपने नवीन चेहर्यांना संधी देणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. या अंतर्गत धुसफुसीचा आणि नाराज मंडळींचा थेट फायदा आगामी काळात आम्हालाच मिळणार आहे. दुसरीकडे, महायुतीचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांनी मात्र हे बंड मोडून काढत विजयाचा दावा केला आहे. ते म्हणाले, अमरनाथ राजूरकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळूनच हा निर्णय घेतला आहे. काही मित्रपक्षांचे नेते वैयक्तिक कारणास्तव मुंबईला गेले असले तरी त्यांचे प्रतिनिधी अर्ज भरताना उपस्थित होते. दोन्ही आमदारांची भेट ही अनौपचारिक असू शकते. आमच्याकडे केवळ महायुतीचेच नव्हे, तर ’अदृश्य’ आणि ’सदृश्य’ अशा दोन्ही बाजूंचे पाठबळ असल्याने आमचा विजय निश्चित आहे. राजूरकरांच्या उमेदवारीने नांदेडच्या राजकारणात नवीन भूकंप घडवून आणला असून, चिखलीकर आणि पाटील हे महायुतीचा धर्म पाळणार की बंडाचे निशाण फडकवणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS