नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असला, तरी शुक्रवारपासून हवामानात काहीसा बदल होण्याची

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असला, तरी शुक्रवारपासून हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशसह सुमारे दहा राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस, मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
बिहारमधील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. राजस्थानमधील जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, राजस्थानमधील श्रीगंगानगर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून तेथे तापमान ४८.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. जैसलमेर, फलोदी, बिकानेर आणि गंगानगर परिसरात उष्णतेच्या लाटेचा मोठा प्रभाव जाणवला.
नागपूरमध्ये उष्णतेचा हाहाकार; १६ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ महाराष्ट्रातील नागपूरमध्येही उष्णतेचा प्रचंड प्रभाव दिसून आला. गेल्या तीन दिवसांत रेल्वे स्थानक, रस्ते, उड्डाणपूल परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी १६ व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या मृत्यूंचा संबंध उष्णतेच्या तीव्रतेशी असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी नागपूरचे कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
उत्तर भारतात गारांच्या पावसाची शक्यता उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पर्वतीय राज्यांमध्ये पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये तापमानात ३ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २९ मे ते ५ जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशातील सुमारे ८० ते ९० टक्के भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळू शकतात, ज्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS