माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक आणि शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. कडक उन्हाळ्यात पिके करपून जात अस

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक आणि शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. कडक उन्हाळ्यात पिके करपून जात असताना जनावरांना पाणी नाही, तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र महावितरणच्या अधिकार्यांना याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
स्थानिकांच्या आरोपानुसार, संबंधित काळे इंजिनिअर यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील वीजपुरवठ्याचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. वीज पाच मिनिटे येते आणि पुन्हा तासन्तास गायब होते. त्यामुळे शेतकर्यांच्या विहिरीवरील मोटारी बंद पडल्या असून पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सहन करणार्या शेतकर्यांना आता महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला असून महावितरणने जनतेची लाज काढली आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. वारंवार फोन करून तक्रारी केल्या तरी अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. एकीकडे सरकार शेतकर्यांच्या मदतीच्या घोषणा करत असताना दुसरीकडे महावितरणचे काही अधिकारी एसी कार्यालयात बसून जनतेच्या दुःखाकडे डोळेझाक करत असल्याची भावना परिसरात निर्माण झाली आहे. तातडीने सुरळीत वीजपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकर्यांच्या फोनकडे काळे इंजिनिअरचे दुर्लक्ष; माझं कुणी काय वाकडं करत नाही अशी भाषा
खरात आडगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित काळे इंजिनिअर यांना वारंवार फोन केले जातात; मात्र ते अनेकदा फोन उचलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माझं कुणी काय वाकडं करत नाही, अशी बोलीभाषा वापरत जनतेशी उर्मटपणे वागणूक दिली जात असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे उप अभियंता हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून नागरिकांचे फोन तात्काळ उचलतात, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. मात्र संबंधित विभागातील तांत्रिक माहिती लाईनमन किंवा संबंधित इंजिनिअरकडेच असल्यामुळे उप अभियंत्यांना पुन्हा संबंधित कर्मचार्यांकडून माहिती घेऊन नागरिकांना माहिती द्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटण्याऐवजी वेळकाढूपणा होत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

COMMENTS