नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश अर्थात नीट परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात ये

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश अर्थात नीट परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली. यंदाच्या नीट-पदवीपूर्व परीक्षेचा प्रश्नसंच फुटल्याचे सरकारने मान्य केले असून, त्यामुळे परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा 21 जून रोजी घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
नीट परीक्षा 3 मे रोजी देशातील 551 शहरांसह परदेशातील 14 शहरांत ही परीक्षा घेण्यात आली होती. सुमारे 5400 परीक्षा केंद्रांवर 22.79 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र, प्रश्नसंच फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षा रद्द केली. आता फेरपरीक्षा रविवार, 21 जून रोजी होणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने कोणालाही प्रवेश मिळू नये, यासाठी जबाबदारीने निर्णय घेण्यात आला. 7 मे रोजी गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारला कळवण्यात आले आणि त्यानंतर फेरपरीक्षेचा निर्णय घेण्यात आला. प्रश्नसंच फुटीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आदी राज्यांमधील आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रश्नसंच राजस्थानातील सीकरपर्यंत पोहोचवण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याचा संशय आहे. तपास यंत्रणेला हस्तलिखित प्रश्नसंच, त्याचे संगणकीय रूपांतर आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रसार केल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. 12 मे रोजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षा रद्द केली आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला. त्यानंतर विविध राज्यांत छापे टाकून चौकशी सुरू करण्यात आली. काही प्रशिक्षण केंद्र चालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची चौकशी झाली. वैद्यकीय संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन देखरेखीखाली फेरपरीक्षेची मागणी केली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी स्वायत्त संस्था असून तिची स्थापना 2017 मध्ये झाली. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा घेण्याची जबाबदारी या संस्थेकडे आहे. नीटच्या माध्यमातून देशातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि परिचारिका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. देशभरात एक लाखांहून अधिक वैद्यकीय आणि सुमारे 27 हजार दंतवैद्यकीय जागांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
फेरपरीक्षेबाबत महत्त्वाच्या घोषणा
प्रवेशपत्रे 14 जूनपासून उपलब्ध होणार
विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ
परीक्षा केंद्र निवडण्यासाठी सात दिवसांची मुदत

COMMENTS